Sunday, February 10, 2019

‘कमला’चे दोन शेवट

माझा  - 'कमला'चे दोन शेवट - हा लेख 'ऐसी अक्षरे' ह्या संकेत स्थळावर प्रकाशित केला आहे. त्यात तेंडुलकरांच्या कमला ह्या नाटक आणि चित्रपट ह्यामधील एका संवादावर निरूपण आहे. 

Tuesday, August 25, 2015

विचार आणि दर्शन: जे. कृष्णमूर्ती आणि डेव्हिड बोम यातील एक संवाद

("विचार आणि दर्शन" प्रकरण बघण्यासाठी इथे क्लिक करा.)

आध्यात्मिक गुरू जिद्दू कृष्णमूर्ती व भौतिकशास्त्रज्ञ डेव्हिड बोम १९६१ मध्ये प्रथम भेटले. त्यानंतर १९८६ मध्ये कृष्णमूर्तींचा मृत्यू होईपर्यंत ते एकमेकांना अनेक वेळा भेटत राहिले. या दोघातील अनेक संवाद पुस्तक रूपात प्रकाशित करण्यात आले आहेत.  "काळाचा अंत" ("The Ending of Time") हे त्यापैकी सर्वात लोकप्रिय पुस्तक.  "The Limits of Thought" (विचाराची मर्यादा)  हे अशाच संवांदांनी संकलीत केलेले एक पुस्तक. ह्यामध्ये कृष्णमूर्ती आणि बोम ह्यांच्या १९७५ ते १९८० ह्या काळात झालेले काही संवाद संकलीत केले आहेत. त्यातले "Thought and perception" (विचार आणि दर्शन) हे चौथे प्रकरण. हा संवाद २५ जुलै १९७५ रोजी स्ताद, स्वित्झर्लंड येथे घडला. ’दिसते तसे नसते म्हणून जग फसते’ असे आपण म्हणतो. म्हणजे नेमके काय हे खोलात जाऊन बघण्याचा प्रयत्न हा संवाद करतो.

माझे वडील पद्माकर दाभोळकर हे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कृष्णमूर्तींच्या विचारांचा अभ्यास करीत आहेत. ते या वर्षी मे-जून महिन्यात आमच्याकडे बंगलोरला आले असताना त्यांनी "Limits of thought" चा मराठी अनुवाद करण्यास सुरूवात केली. चिंतन हा यामागचा मूख्य हेतू. ते होत असताना मीच त्यांना असे सुचवल की आपण हे चौथे प्रकरण (विचार आणि दर्शन) इंटरनेटवर ठेऊन बघुया - कदाचित जास्ती लोकांपर्यंत ते पोहोचू शकेल. अशी ही ह्यामागची भूमिका. बघा तुम्हाला कसे वाटते ते.

"विचार आणि दर्शन" प्रकरण बघण्यासाठी इथे क्लिक करा.

आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. माझ्या बाबांचा इ-मेल आहे: pvdabs@gmail.com.

Tuesday, January 19, 2010

कल्पना-शेती: एक संवाद

अहो विनूभाऊ,
हल्ली तुम्ही काय करता?
कोणी म्हणतात कसलेसे
शेती संशोधन वगैरे करता

अहो सदूभाऊ, तुम्हीसुद्धा
भलतीच कमाल करता
कल्पना शेतीला
कसलीशी काय म्हणता?

छे छे विनूभाऊ
हल्ली सगळाच गोंधळ झालाय
वर्तमानपत्र वाचायलासुद्धा
संगणक लागायला लागलाय

गहू तांदूळ ऊस नाचणी
ह्यांची शेती ठाऊक आहे
कल्पना-शेती म्हणता ही
भानगड नेमकी काय आहे?

सदूभाऊ, भानगड वगैरे काही नाही
गोष्ट तशी प्राचीन आहे
विहिरीची मोट, सुपारीचा आडकित्ता
हे सगळे सुपीक डोक्यातूनच आलेले आहे

सुपीक डोक्यांच ठीक आहे
कल्पनांचे त्यांना वरदान असते
आमच्यासारख्या नापीक डोक्याला
असल्या गोष्टींचे दूर्भीक्ष असते

हे तुमचे बरोबर आहे, सदुभाऊ
पण माझी एक शंका आहे
तुमच्या जाड चष्म्याची
एक कांडी वेगळी का हो आहे?

विनुभाऊ, काय सांगू
त्याची मोठी गंमतच झाली
आमच्या धाकट्या नातवाची
एक थप्पड चष्म्यावर पडली

म्हटले जूना एक चष्मा शोधून
कांडीस कांडी जोडून पाहू
नाहीतरी रिकाम टेकडा
म्हटले थोडा उद्योग जमतो तर बघू

वा सदुभाऊ, फारच छान
जूनी सवय अजून तशीच दिसते
पण एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या?
कि नापीक डोके मुळी अस्तित्वातच नसते

वा विनुभाऊ, आता मात्र
आम्हाला सावध व्हायला हव
तुमच्या आडकित्त्यापासून
दूर रहायला हव

सठी सामाशी एखादी कल्पना,
अशाने भरघोस पीक कसे निघणार?
दाणा-पाणी आणी माती
यांचा योग कसा जुळून येणार?

सदुभाऊ, कल्पना-शेती हा
एकट्याचा खेळ मुळी नसतो
कल्पनांची देवाणघेवाण, चारचौघांबरोबर कंबर कसली नाही
तर ह्या खेळात आपण सपशेल फसतो

एडिसनचा दिवा काय किंवा
गांधीजींचा सत्याग्रह काय
शेवटी नेमकी गरज समजण्यावाचून
आपल्याला पर्याय तो काय?

विनुभाऊ, तुम्ही मोठ्या बाता करू नका
एडिसन, गांधीजींच्या गोष्टी सांगू नका
चष्म्याची कांडी कुठे आणि विजेचा दिवा कुठे
बरोबरीत काही तारतम्य राखायला नको का?

सदुभाऊ, चेंडू जसा "षटकार" लिहून
फ़लंदाजाकडे येत नाही
तशीच कल्पनासुद्धा "लहान-मोठी" लेबल लावून
जन्म घेत नाही

पण गांधीजींच्या उदाहरणावरून
एक मात्र पटते
लोकांत एकरूप झाल्याशिवाय
मीठाचे महत्त्व कळत नसते

विनुभाऊ, घटकाभर धरून चाला
आम्हीही एकरूप व्हायला शिकलो
गावा-समाजातल्या एखाद्या थराच्या
क्लेष-आकांक्षा जाणून घ्यायला शिकलो

पण गांधी-एडिसनच्या मार्गाने पुढे कसे जायचे ते
आम्हाला कधी कळणार का?
दाण्यापासून पीकापर्यंत करायच्या
सगळ्या गोष्टी कधी जमणार का?

सदुभाऊ तुम्हाला एक गुपीत सांगू का?
प्रयोगशीलता हा कल्पना-शेतीचा गाभा आहे
भले मीठाचा कायदा तोडायचा ठरवला तरी
पाऊल पुढे टाकल्याशिवाय का दांडी गाव येणार आहे?

सदुभाऊ आपल्याला एक मात्र बघायला हव
साप-शिडीच्या खेळापासून सावध रहायला हव
कल्पनेची भरारी मोहीत करणारी असते, पण
सत्याग्रहानंतर येणारी फाळणी टाळता आली तर पहायला हव

विनुभाऊ, मजा आला, पण मला वाटते
आजच्यासाठी एवढे प्रवचन पुरे आहे
कल्पनांचे मोहोळ उठण्यासाठी
पिकाऊ डोक्याला आता चहाच्या खताची गरज आहे